नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कुलकर्णी गार्डन भागात हात उसनवारीचे पैसे घेण्यासाठी गेलेल्या एकास टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तात्काळ एका संशयितास अटक केली आहे. या घटनेत लाकडी दांडक्यासह लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने सदर इसम जखमी झाला आहे. रामकृष्ण मधुकर चित्ते (रा.सप्तशृंगी चौक,पवननगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुधाकर पवार, दीपक ठाकरे व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे असून त्यातील ठाकरे यास अटक करण्यात आली आहे. चित्ते गुरूवारी (दि.१) रात्री कुलकर्णी गार्डन भागातील सत्कार हॉटेल येथे उसनवारीने दिलेले पैसे घेण्यासाठी गेले असता ही घटना घडली. चित्ते यांना गाठून संशयित टोळक्याने अज्ञात कारणातून त्यांना लाकडी दांडक्यासह लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत चित्ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार धारणकर करीत आहेत.