नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – संसरीगाव परिसरातून चोरलेल्या मोटारसायकली हस्तगत करुन दोन चोरांना पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली. या चोरट्यांकडून संशयितांना मुद्देमालासह देवळाली कॅम्प पोलिसाकडे स्वाधिन करण्यात आले असून त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. कुणाल विजय लहांगे (१८ रा.कोळीवाडा संसरीगाव) व वेदांत चंद्रकांत बच्छाव (१८ रा.पांजरा कॉलनी साक्री,जि.धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. युनिटचे हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या टोळीचा भांडाफोड झाला आहे. संसरीगावातील अजय पासवान (रा.भैरवनाथनगर) यांची यामाहा एमएच १५ सीटी ०९१ मोटारसायकल २९ जुलै रोजी रात्री त्यांच्याच सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीस गेली होती. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित लहांगे हा मोटारसायकल चोर असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने संशयिताच्या मुसक्या आवळल्या असता या चोरींचा उलगडा झाला. पोलिस तपासात त्याने वेदांत बच्छाव आणि प्रेम पाईकराव या साथीदारांच्या मदतीने गेल्या महिन्यात संसरीगावातून दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. दोन्ही मोटारसायकली बच्छाव आपल्या गावी विक्रीसाठी घेवून गेल्याची माहिती मिळताच पथकाने साक्री गाठून बच्छाव यास बेड्या ठोकल्या असून त्याच्या ताब्यातून यामाहा तर मित्र उत्कर्ष चौधरी यास विक्री केलेली स्प्लेंडर एमएच १५ एचबी ७०७४ हस्तगत केली आहे. दोन्ही संशयितांच्या अटकेने देवळाली कॅम्प पोलिसांचे दोन गुन्हे उघडकीस आले असून संशयितांना सुमारे २ लाख ५ हजार रूपये किमतीच्या मुद्देमालासह संबधीत पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोनार,नंदकुमार नांदूर्डीकर,राजेंद्र घुमरे,अनिल लोंढे व संतोष ठाकूर आदींच्या पथकाने केली.