नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -दिंडोरीरोड येथील मार्केट यार्डात मोबाईलची चोरी करणारा चोरटा नागरिकांच्या हाती लागला. आरडोओरड केल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना चोरट्याला पकडले. त्याला बेदम चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पप्पू सोनू पवार (२३ रा.गोंडवाडी,फुलेनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजन रमेश जोशी (रा.शनि चौक,काळाराम मंदिराजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. जोशी शुक्रवारी दुपारच्या सुमारास पत्नी आणि मुलीस सोबत घेवून भाजापाला खरेदी करण्यासाठी दिंडोरीरोड येथील मार्केट यार्डात गेले होते. जोशी कुटूंबिय भाजीपाला खरेदी करीत असतांना गर्दीची संधी साधत भामट्यांने जोशी यांच्या खिशातील सुमारे १४ हजार रूपये किमतीचा मोबाईल हातोहात लांबविला. हा प्रकार सोबत असलेल्या मुलीच्या लक्षात येताच तिने आरडाओरड केल्याने भामटा हाती लागला. जोशी कुटूंबियांनी धाडसाने त्यास पकडून ठेवल्याने नागरीकांनी त्यास बेदम चोप दिला. ही घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेतले असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.