नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने अटक केलेला जीएसटी विभागाचा सुप्रिटेंडंट चंद्रकांत चव्हाणके याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने येत्या ३० ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. तसेच, चव्हाणकेच्या केबिनमधून ३७ हजार तर घराच्या झडतीतून २ लाख रुपयांची रक्कम सीबीआयच्या पथकाने हस्तगत केली आहे.
सीबीआयच्या पथकाला लाचखोरीची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार सीबीआयच्या मुंबईतील विशेष पथकाने सापळा रचला. आणि या सापळ्यामध्ये चव्हाणके हा सापडला. जीएसटी नंबर रद्द करण्यासाठी चव्हाणकेने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती अखेर ८ हजार रुपये निश्चित करण्यात आले. अंबड लिंक रोडवरील सीजीएसटी कार्यालयात चव्हाणकेला ८ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. पथकाने सर्व प्रक्रिया पूर्ण करुन चव्हाणकेविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सीबीआयच्या वकीलांनी न्यायालयात दावा केली की, चव्हाणकेच्या केबिनमधून ३७ हजार तर त्याच्या घरातून २ लाख रुपयांची रक्कम सीबीआय पथकाने हस्तगत केली आहे. न्यायालयाने या सर्व प्रकाराची दखल घेत येत्या ३० ऑगस्टपर्यंत चव्हाणकेला कोठडी सुनावली आहे. आता चव्हाणकेची आणखी कसून चौकशी होणार आहे.
CBI Nashik CGST Superintendent Bribe Custody Amount