नाशिक – चोरट्यांनी वेगवेगळया भागात दोन महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र लंपास केल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी पंचवटी आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना ठक्कर बाजार परिसरात घडली. मुंबई येथील समृध्दी स्वप्निल जोशी (रा.खंबाळा पाडा,डोंबिवली) या शहरात आल्या होत्या. सोमवारी (दि.१५) परतीच्या प्रवासासाठी त्या ठक्कर बाजार परिसरातील ट्रव्हल्सच्या खासगी बस लागत असलेल्या ठिकाणी गेल्या असता ही घटना घडली. तुळजा बिअर बार भागात त्या बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्रा चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार धारणकर करीत आहेत. दुसरी घटना गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिरा जवळ घडली. चाळीसगाव येथील भाग्यश्री संदिप सुर्यवंशी (रा.शिरसगाव टाकळी) या तिस-या श्रावणी सोमवार निमित्त १५ ऑगष्ट रोजी देवदर्शनासाठी शहरात आल्या होत्या. दुपारच्या सुमारास त्या गोदाघाटावरील कपालेश्वर मंदिरात गेल्या असता ही घटना घडली. देवदर्शनाच्या रांगेत उभ्या असतांना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे १५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक वाघमारे करीत आहेत.