नाशिक : दिंडोरीनाका भागात गरम पाणी काढत असतांना गॅस गिझरचा भडका होवून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राजेश पांडूरंग आढवणे (५४ रा.आदित्यकुंज अपा.दिंडोरीनाका) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गंभीर भाजलेल्या आढवणे यांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आढवणे गेल्या गुरूवारी (दि.११) सकाळच्या सुमारास आपल्या घरातील बाथरूममध्ये गरम पाणी काढत असतांना ही घटना घडली होती. अचानक गॅस गिझरचा भडका उडाल्याने ते गंभीर भाजले होते. आडगाव नाका येथील सदगुरू हॉस्पिटल येथे त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात केले असता सोमवारी (दि.१५) त्यांचा मृत्यू झाला. गेली चार – पाच दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.