नाशिक – नाशिक महापालिका आयुक्तपदी नव्याने नियुक्त झालेल्या डॉ. चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या नावाने फेक मेसेज पाठवून महापालिका अधिकाऱ्यांकडून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महापालिका आयुक्तांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मनपा आयुक्तांच्या नावाने व्हॅाटसअॅपवर फेक मेसेज टाकून ही फसवणूक करण्यात येत आहे. या आयुक्तांच्या फोटोचाही वापर करण्यात आलेला आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार यांनी या प्रकाराबाबत सांगितले की, माझ्या नावाने ९८३४२४६२६३ या नंबरवरून महापालिका अधिकाऱ्यांना व्हॅाटसॲपवर मेसेज पाठवतो. त्या मेसेजमध्ये लिंकवर पेमेंट करण्यास सांगत आहे. या भामट्याने माझा फोटो डिपी वर ठेवला आहे. मी पोलीस आयुक्तांकडे रीतसर तक्रार केलेली आहे. अशा भामट्यांच्या मेसेजला बळी पडू नका. कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका.
गेल्या काही दिवसात सायबर क्राईमचे प्रमाण वाढले आहे. त्यात आयुक्तांच्या नावाने पैसे उकळण्याचा हा प्रकार मात्र गंभीर आहे. नाशिकमध्ये गेल्या सहा महिन्यात ६०० हून अधिक सायबर क्राईमच्या तक्रारी दाखल झाल्या आहे. त्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. आता तर अधिका-यांच्या नावाने पैसे मागण्याचा हा नवीन प्रकार समोर आला आहे.