नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र दिनी ड्राय डे असतांना बेकायदा दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करत सुमारे दहा हजार रूपये किंमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प, उपनगर, अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आली आहेत.
पहिली कारवाई आगर टाकळी येथील समता नगर भागात करण्यात आली. शंकर महादू शिंदे व सागर शंकर शिंदे (रा. महात्मा फुले चौक, समतानगर) हे दोघे सोमवारी रात्री परिसरातील अंबिका हॉटेल शेजारील बोळीत मद्यविक्री करतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून सुमारे ४ हजार ३०० रूपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस शिपाई सुनिल खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत. तिसरी कारवाई चुंचाळे शिवारात करण्यात आली.
जनार्दन चंदू धोंगडे (२५ रा. कोळीवाडा सारूळ) हा युवक शनिवारी (दि.२९) रात्री घरकुल योजनेतील विश्वरत्न अपार्टमेंट पाठीमागे दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून २ हजार ४८० रूपये किमतीचा देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी दिपक जगताप यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.
दुसरी कारवाई देवळाली कॅम्प येथील लेव्हीट मार्केट भागात करण्यात आली. सोमवारी एक जण बेकायदा मद्यविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता अशोक संजय घोष (५५ रा. डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ, जुनी स्टेशनवाडी) हा अमोल आडके यांच्या दुध विक्री दुकानाजवळील बोळीत दारू विक्री करतांना मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून एक हजार ६८० रूपये किमतीचा दारू साठा हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी हवालदार सुनिल जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.
याच दिवशी सुनिल नारायण जाधव (रा.राजवाडा शिंदेगाव, ता.जि.नाशिक) हा शिंदे गावातील ग्रामपंचायत कार्यालय परिसरातील सार्वजनिक ठिकाणी मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ९८० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई केतन कोकाटे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.