नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्टिलरी सेंटर रोडवरील खोले मळा भागात शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या वृध्देच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेले. याप्रकरणी शोभा राजेंद्र चुडीवाल (६८ रा.हरिओमनगर, खोलेमळा) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चुडीवाल या बुधवारी (दि.२६) शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. खोलेमळयातील सुनिल सर्व्हीस सेंटर समोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सागर डगळे करीत आहेत.
तरूणाची वाट अडवित दुचाकीस्वार दुकलीने दमदाटी करीत मोबाईल लंपास केला
औद्योगिक वसाहतीत रस्त्याने पायी जाणा-या तरूणाची वाट अडवित दुचाकीस्वार दुकलीने दमदाटी करीत मोबाईल लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी कार्तिक राजेंद्र कानडे (१८ रा. एमएसईबी कॉलनी, शिवनेरी गार्डनजवळ, सातपूर ) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. सातपूर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कानडे गेल्या १० मार्च रोजी रात्री औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीव आलेल्या दोन जणांनी त्यास अडवित दमदाटी केली. यावेळी दुकलीने त्याची अंगझडती घेत त्याच्या खिशातील सुमारे साडे बारा हजार रूपये किमतीचा मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास श्याम जाधव करीत आहेत.