नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ड्राय डे घोषीत असतांना शुक्रवारी बेकायदा दारू विक्री करणा-या चौघांना पोलिसांनी गजाआड करुन एक लाखाहून अधिक किमतीचा मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी अंबड,गंगापूर आणि पंचवटी पोलिस ठाण्यात गु्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड औद्योगीक वसाहतीतील एमएसईबीच्या सबस्टेशन भागात ड्राय डे ला बेकायदा दारू विक्री होत असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता हेमंत अशोक धोंडगे उर्फ हेमंत पाटील (४१ रा.नारायणी अपा.चर्च मागे,उत्तमनगर सिडको) हा सबस्टेशनसमोरील रोडवर उघड्यावर नॅनोकारमधून दारू विक्री करतांना मिळून आला. संशयितास बेड्या ठोकत त्याच्या ताब्यातील मद्यासह कार असा सुमारे १ लाख २ हजार ७५ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी पोलिस कर्मचारी राठोड यांनी दिलेल्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई चुंचाळे शिवारात करण्यात आली. नवनाथ चंदू धोंडगे (३० रा.कोळीवाडा महालक्ष्मी मंदिरा शेजारी,सारूळ विल्होळी) हा चुंचाळे शिवारातील घरकुल भागात असलेल्या विश्वरत्न अपार्टमेंट परिसरात मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून देशी दारूच्या सुमारे २ हजार ३३० रूपये किमतीचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी ढाकणे यांनी तक्रार दाखल केली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
तिसरी कारवाई गंगापूररोडवरील ध्रुवनगर भागात करण्यात आली. गोरख माथू पाटील (४१ रा.गुलमोहर कॉलनी ध्रुवनगर) हा परिसरातील शनिमंदिर भागातील पाटाच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला मद्यविक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून एक हजार ५० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
चौथी घटना पेठरोड भागात उघडकीस आली. सुरेश नारायण जाधव (३३ रा. गल्ली नं.४ लक्ष्मणनगर,पेठरोड) हा आपल्या घर परिसरात दारू विक्री करतांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून सुमारे १ हजार ३८० रूपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिस शिपाई पचलोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.