नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सावकाराने गॅरेज व्यावसायीक असलेल्या कर्जदाराच्या घरात शिरून कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात विविध कलमांसह सावकारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप खैरनोर (रा.काठे गल्ली, द्वारका) असे संशयित खासगी सावकाराचे नाव आहे.
याप्रकरणी धवल जयदीश गज्जर (३३ रा. श्रीजी पर्श गोविंदनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. गज्जर यांचा वाहन दुरूस्तीचा व्यवसाय आहे. २०१५ मध्ये गॅरेजमध्ये वाहन दुरूस्तीसाठी आलेल्या सावकाराशी त्यांची ओळख झाली होती. यावेळी आर्थिक चणचण असल्याचे गज्जर यांनी सांगितल्याने सदर सावकाराने त्यांना काही रक्कम दिली होती.
त्यानंतरही वेळोवेळी गज्जर यांनी त्याच्याकडून काही रकमा घेतला. वेळोवेळी व्याज देवूनही संशयिताकडून दहा लाख रूपयांची मागणी करण्यात येत आहे. व्याज थकल्याने संशयिताने गज्जर यांचे घरात अनधिकृत पणे प्रवेश करीत कुटुंबियासह नातेवाईकांना शिवीगाळ केली. तसेच पैसे परत केले नाही तर सर्वांना जीवे ठार मारेल अशी धमकी दिल्याने गज्जर यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे करीत आहेत.