नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल हिसकावून पोबारा करणा-या पल्सरस्वारांना पोलिसांनी गजाआड केले आहे. काट्या मारूती चौकीतील कर्मचा-यांनी पाठलाग करुन दोघा चोरांना पकडले आहे. उदय सुनिल चारोस्कर (२० रा. लक्ष्मणनगर, फुलेनगर) व अंकुश अरूण गायकवाड (१९ रा. मायको दवाखान्यामागे, कालिकानगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित मोबाईल चोरट्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संजय संतू शार्दुल (रा.उमराळे खुर्द ता.दिंडोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. शार्दुल बुधवारी (दि.२९) कामानिमित्त शहरात आले होते. पंचमुखी हनुमान मंदिरासमोरून ते रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. फोनवर बोलत ते रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या पल्सरस्वारांनी त्यांच्या हातातील सुमारे पंधरा हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला.
या वेळी शार्दुल यांनी चोर चोर अशी आरडाओरड केल्याने नजीकच्या काटयामारूती चौकीतील कर्मचा-यांनी धाव घेत दुचाकीस्वारांचा पाठलाग केला. हिरावाडी भागात पल्सरवरील दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1640953932187942915?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1641369030912282624?s=20