अपघातांची मालिका सुरूच; वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिला अपघात पाथर्डी शिवारात झाला. अनिल अशोक दोंदे (३२ रा.प्रगती फार्म, दोंदे मळा) हे सोमवारी (दि.२७) पाथर्डीगावातून आपल्या घराकडे दुचाकीवर जात असतांना जाधव पेट्रोल पंपासमोर त्यांची मोटारसायकल घसरली होती. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने कुटुंबियांनी त्यांना वक्रतुंड रूग्णालया मार्फत आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता गुरूवारी (दि.२९) उपचार सुरू असतांना डॉ.अथर्व चौकडे यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.
दुसरा अपघात भगूर मार्गावर झाला. मुंबई येथील आनंत सामंत राय (३० रा.पनवेल) हे गेल्या शनिवारी (दि.२५) भगूर मार्गावरून आपल्या मोटारसायकलवर प्रवास करीत असतांना अचानक दुचाकी घसरली होती. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने पत्नी रिना राय यांनी त्यांना गंगापूररोडवरील कासलीवाल रूग्णालयात दाखल केले असता मंगळवारी (दि.२८) उपचार सुरू असतांना डॉ.इशांत नेरकर यांनी मृत घोषीत केले. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गुंजाळ करीत आहेत.
पाथर्डी शिवारात ३८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी शिवारातील गुलमोहरनगर भागात घडली. जितेंद्र सुरेश कापसे (रा.शिवगंगा हाईटस, रिलायन्स मार्टच्या मागे, शेल पेट्रोलपंपा समोर गुलमोहरनगर ) असे मृताचे नाव आहे. कापसे याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कापसे यानी बुधवारी (दि.२९) आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेजारी जयेश सनानसे यांनी खबर दिल्याने पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.