पार्क केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी पन्नास हजाराची रोकड केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पार्क केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून चोरट्यांनी सुमारे पन्नास हजाराच्या रोकड लंपास केल्याची घटना बिटको हॉस्पिटल जवळ घडली. या चोरीप्रकरणी मेहबुब मोहम्मद शेख (रा.फातीमानगर,अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख सोमवारी (दि.२७) नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटल भागात गेले होते. कटारिया हार्डवेअर दुकानासमोर त्यांनी आपली मोपेड दुचाकी पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी पार्क केलेल्या दुचाकीची डिक्की उघडून ४९ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास पोलिस नाईक देवरे करीत आहेत.
तलवार घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीत तलवार घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. योगेश विजय मराळ (२७ रा.शांतीनगर झोपडपट्टी,गरवारे पॉईंट) असे अटक केलेल्या तलवारधारी संशयिताचे नाव आहे. मराळ याच्या ताब्यातून तलवार हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड लिंकरोडवरील केवल पार्क भागात दहशत माजविण्याच्या उद्देशाने एक तरूण तलवार घेवून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास ही कारवाई केली. पोलिसांनी धाव घेत संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात पितळी मुठाची तलवार मिळून आली. याप्रकरणी अंमलदार सागर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.