नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत संचार निगमच्या प्रदिर्घ सेवेत पदोन्नतीने उपअधियंता पर्यंत पोहचून सेवानिवृत्त झालेल्या अधिका-याचा जातीचा दाखला खोटा असल्याचे समोर आले आहे. या अधिका-यावर पडताळणी अंती थेट फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर तरळ असे संबधीत सेवानिवृत्त अधिका-याचे नाव आहे.
याप्रकरणी भारत संचार निगमचे देविदास खैरनार यांनी तक्रार दाखल केली आहे. तरळ भारत संचार निगमच्या सेवेत होते. पूर्वीच्या जातीच्या दाखल्यावरून आदिवासी प्रवार्गातून त्यांना सेवेत दाखल करण्यात आले होते. सेवेत असतांना संवर्गातून त्यांनी पदोन्नतीने अनेक पदे उपभोगली. गेल्या वर्षी नाशिक दुरध्वनी केंद्राच्या उपमंडळ अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्तही झाले.
मात्र सेवानिवृत्तीपूर्वी भारत संचार निगम यांनी त्यांची जातपडताळणी केली असता बनावट जातीचा हा प्रकार समोर आला. जात वैधता समितीच्या चौकशीत त्यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.