नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. याप्रकरणी सातपूर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या अपघातात एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तर दुस-याचा भरधाव दुचाकी घसरल्याने मृत्यू झाला.
पहिला अपघात सौभाग्यनगर भागात झाला. या अपघातात राहूल नरसिंग जाधव (रा.मधुबन सोसा.बनकर चौक,काठेगल्ली) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जाधव व निखील दिपक मोरे (रा.आकाशगंगा सोसा.काठेगल्ली) हे दोघे मित्र शुक्रवारी (दि.२४) देवळाली कॅम्प भागात गेले होते. रात्रीच्या वेळी दोघे आपल्या घरी दुचाकीने परतत असतांना हा अपघात झाला.
सौभाग्यनगर येथील डेमिनोज पिझ्झा समोर रोडवरील स्पिडब्रेकरवर भरधाव दुचाकी घसरल्याने दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील जाधव याचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी मोरे याने दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत जाधव याच्याविरोधात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक विंचू करीत आहेत.
दुसरा अपघात सिएट कंपनीजवळील बाबाज बेकरी जवळ झाला. योगेश बापूसाहेब परदेशी (२७ रा. अंबड लिंकरोड,चिंचाळे शिवार) हा युवक गेल्या बुधवारी (दि.२२) सातपूर औद्योगीक वसाहतीतून आपल्या घराकडे एमएच १५ ईएम ३४८८ या दुचाकीवर जात असतांना हा अपघात झाला होता.
सिएट कंपनीजवळील बाबाज बेकरी भागात भरधाव अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आई भारती परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.