नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंपनीच्या विविध स्किमचे आमिष दाखवून दाम्पत्यासह एकाने अनेकांना गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी प्रशांत जीवन गुरव (४५ रा. डीजीपीनगर २ अंबड) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात विश्वासघातासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर त्र्यंबक दरगुडे, निकीता ज्ञानेश्वर दुरगुडे (रा.दोघे ब्राम्हणगाव – लासलगाव ता.निफाड) व संजय जगताप नामक संशयितावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी २०१६ मध्ये महात्मानगर येथील कदम मेन्शन कॉम्प्लेक्समध्ये रियल रिचार्ज अॅण्ड मार्केटींग नावाच्या कंपनीचे कार्यालय थाटले होते. यावेळी गुरव व त्यांच्या नातेवाईकांनी संशयितांशी संपर्क साधला होता. संशयित दाम्पत्याने गुरव यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांना कंपनीच्या विविध स्किमचे आमिष दाखवून कंपनीतील गुंतवणुकीवर भरघोस मोबदला देण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार गुरव व त्यांच्या नातेवाईकांनी २० जून २०१६ ते ५ मार्च २०१७ दरम्यान सुमारे ७ लाख ७४ हजाराची गुंतवणुक केली होती.
गुंतवणुकीवरील मोबदल्याची मुदत संपूनही संशयितांनी गुंतवणुकीची रक्कम आणि मोबदला परत न केल्याने गुरव यांनी तगादा लावला असता संशयित त्रिकुटाने टोलवाटोलवी केली. त्यामुळे गुरव व त्यांच्या नातेवाईकांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची भेट घेतल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.