नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील कारखाना मालकास दोन लाखांना गंडा घालण्यात आला आहे. कंपनीचे साहित्य पुरविण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंगे (रा.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली असून सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतन रमेश शहा (३७ रा. ओएसिस कृष्णकुंज, संधानी इस्टेट घाटकोपर) असे कारखानदारास गंडविणा-या संशयिताचे नाव आहे. पंगे यांचा सातपूर औद्योगीक वसाहतीत कारखाना आहे. सन.२०२० मध्ये त्यांना कंपनीसाठी साहित्य खरेदी करायचे असल्याने त्यांनी संशयिताशी संपर्क साधला होता.
यावेळी साहित्य पुरविण्याच्या मोबदल्यात दोन लाख रूपयांची मागणी करण्यात आल्याने पंगे यांनी ५ नोव्हेंबर रोजी आरटीजीएसच्या माध्यमातून संशयितास रोकड पाठविली होती. मात्र संशयिताने कंपनीचे साहित्य पाठविले नाही. तब्बल दोन वर्ष साहित्याची वाट पाहूनही संशयिताने साहित्य अथवा पैसे परत न केल्याने पंगे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गवारे करीत आहेत.