सराईत गुन्हेगाराचा साथीदारासह धुमाकूळ; सीसीटिव्ही व वाहनांची कोयत्याने तोडफोड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारासह धुमाकूळ घालत परिसरातील सीसीटिव्ही व काही वाहनांची कोयत्याने तोडफोड केल्याची घटना गंगापूररोडवरील मल्हारखानीत घडली. हर्षद सुनिल पाटणकर (२५ रा.बेथलेनगर,शरणपूररोड) व यश शिंदे (रा.नागसेन वाडी वडाळानाका) अशी धुमाकूळ घालणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यातील पाटणकर हा सराईत गुन्हेगार आहे. दोघा संशयितांनी सोमवारी (दि.२०) मल्हारखान झोपडपट्टी गाठून कोयत्याचा धाक दाखवत परिसरात दहशत माजविली. यावेळी संशयितांनी परिसरातील सीसीटिव्ही आणि पार्क केलेल्या वाहनांना लक्ष करीत कोयत्याने तोडफोड केली. या घटनेत चार सीसीटिव्ही कॅमेºयासह एमएच १५ झेड ९९९६ ही अॅटोरिक्षा व एमएच १५ जीडी ४१३१ या अॅक्टीव्हा दुचाकीचे मोठे नुकसान केले आहे. याप्रकरणी राजू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी शस्त्रबंदी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक नितीन थेटे करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यानी सुमारे १५ हजाराच्या मुद्देमाल केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यानी सुमारे १५ हजाराच्या मुद्देमाल लंपास केल्याची घटना नाशिकरोड येथील जगताप मळा भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी साड्यांसह देवपुजेचे साहित्य व कॅमेरा चोरुन नेला. याप्रकरणी प्रदिप वासूदेव गोसावी (६६ रा.पुजादीप रो हाऊस,प्रस्टीज पार्क) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोसावी कुटुंबिय ८ ते १९ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रो हाऊसच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील साड्या व चांदीचे देवपुजेचे साहित्य आणि कॅनन कंपनीचा कॅमेरा असा सुमारे १५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.