नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया ठिकाणच्या दोन घटनांमध्ये तरूणीसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. पहिली घटना पळसेगावात घडली. पीडितेच्या काकूने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मेव्हणे भानूदास गायधनी, संगिता गायधनी, पप्पू कावळे व चेतन गायधनी आदी संशयितांनी गुरूवारी (दि.१६) घरासमोर येवून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी पीडिता आपल्या काकूच्या मदतीला धावून आली असता गायधनी बापलेकाने तिचा विनयभंग केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हांडोरे करीत आहेत.
तर दुस-या घटनेत तरूणीचा भररस्त्यात विनयभंग करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलिस ठाणे हद्दीत राहणारी तरूणी गेल्या गुरूवारी (दि.८) महामार्गावरील इंदिरानगर बोगदा भागातून रस्त्याने पायी जात असतांना मनोहर गार्डन जवळ मोहम्मद हमजा मुजफ्फर (रा.भारतनगर,वडाळारोड) या युवकाने तिची वाट अडवित विनयभंग केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.