नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अवघ्या काही तासातच मंदिरासमोरील दानपेटी फोडून रोकड लांबविणारे दुचाकीस्वारावरील तिघांना आडगाव पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्याकडून ९० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. जगदीश बाळू चौथवे (२७ रा.वाल्मिकनगर,कोकणगावरोड कसबे सुकेणे ता.निफाड),हेमराज लक्ष्मण मोरे (२२) व किरण विठ्ठल शेवरे (२३ रा.दोघे ओने सुकेने ता.निफाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर किसन शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आडगाव शिवारातील शिंदेवस्तीवर गुरूवारी (दि.१६) रात्री ही चोरीची घटना घडली होती. धोंडीवीर महाराज मंदिरा समोरील लोखंडी दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड लांबविली होती. आडगाव पोलिसांचे गुन्हे शोध पथक शुक्रवारी आडगाव गावातून पेट्रोलींग करीत असतांना संशयित तिघे दुचाकीवर संशयास्पद फिरतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला असता त्यांनी आपले वाहन दामटल्याने या चोरीचा उलगडा झाला.
गस्ती पथकाने पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी दानपेटी फोडल्याची कबुली देत रोकडसह गुह्यात वापरलेला ऐवज असा सुमारे ८९ हजार ७५६ रूपयांचा मुद्देमाल काढून दिला. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,हवालदार अशोक बस्ते, पोलिस नाईक अरूण अहिरे,सुरंजे,शिपाई दिनेश गुंबाडे,निखील वाघचौरे, होमगार्ड देवकर व बोधले आदींच्या पथकाने केली. अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.