नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका मार्ग भागातील एका रक्ततपासणी करणा-या लॅबच्या दोन कर्मचा-यांविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एका संशयितास अटक करण्यात आली आहे. रक्ताचे बनावट रिपोर्ट दिल्याने ३५ वर्षीय विवाहीतेवर चुकीचा उपचार करण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. औषोधोपचारानंतर महिलेच्या जीवीतास धोका निर्माण झाल्याने डॉक्टराच्या फेरतपासणीत ही बाब निदर्शनास आली. याबाबत रूग्णाच्या पतीने पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात
निलोफर नुरमोहम्मद खान (२७ रा. रेणूकानगर, वडाळानाका) व उदय नारायण सिंग (२९ रा. डीजीपीनगर, कामटवाडे) अशी संशयितांची नावे असून त्यातील उदय सिंग यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रिजवान रमजान शेख (४२ रा.अशोका मार्ग) यांनी तक्रार दाखल केली आहे.
शेख यांच्या पत्नी नाजिया (३५) यांना अचानक त्रास होवू लागल्याने ते परिसरातील खासगी रूग्णालयात गेले होते. रविवारी (दि.१२) शेख दांम्पत्यास रक्ताची चाचणी करण्यास सांगण्यात आल्याने ते संशयित काम करीत असलेल्या लॅबवर गेले असता ही घटना घडली. शेख यांचा रक्तचाचणी अहवाल प्राप्त होताच निदानानुसार रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले. मात्र प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही.
उलट त्यांच्या जीवितास धोका झाल्याने डॉक्टरांना शंका आली. त्यांनी पुन्हा रक्तचाचणी करण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्यांदा रक्त तपासणी करण्यात आली. त्यात दुस-याच आजारामुळे त्रास होत असल्याचे समोर आले. संशयितांनी दिलेल्या खोट्या रिपोर्टमुळे नाजिया शेख यांच्या जीवावर बेतले होते. अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.