नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहरूगार्डन भागात खंडणी देण्यास नकार दिल्याने खाद्यपदार्थ विक्रेत्याची कार पेटवून दिल्याची घटना घटना घडली आहे. या घटनेत कार साहित्यासह जळून खाक झाली आहे. याप्रकरणी दिपक संजय कपिले (रा.टकलेवाडा,रविवार पेठ) या व्यावसायीकान तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिले गेल्या काही दिवसांपासून नेहरू गार्डन भागात इडली व डोसा विक्रीचा व्यवसाय करतात. याच ठिकाणी अन्य खाद्यपदार्थ विक्रेत्येही आपले दुकाने मांडत असल्याने रात्री उशीरापर्यंत या भागात खवय्ये ग्राहकांची मोठी गर्दी असते. रविवारी (दि.१२) रात्री कपिले आपला व्यवसाय सांभाळत असतांना परिसरातील घा-या नामक साराईताने त्यांना गांठून खंडणी मागितली.
या भागात व्यवसाय करायचा असेल तर दरडोई २०० रूपये द्यावे लागतील अशी मागणी संशयिताने केली. मात्र कपिले यांनी त्यास पैसे देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने कपिले आपल्या कामात व्यस्त असल्याची संधी साधत जिमखाना येथील पेअॅण्ड पार्क मध्ये पार्क केलेल्या त्यांच्या ओमनी कार एमएच १५ एएस १३३८ वर काही तरी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली.
कारमध्ये ग्राहकांना बसण्यासाठी ठेवलेल्या प्लॅस्टीकच्या खुर्च्या व गॅस शेगडी होती. आर्थिक नुकसानीच्या उद्देशाने संशयिताने हे कृत्य केले असल्याचा आरोप कपिले यांनी केला असून, या घटनेत कारसह साहित्य जळून खाक झाले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अभिजीत सोनवणे करीत आहेत.