नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विक्री केलेल्या सदनिकेवर पूर्वीच्या मालकाने परस्पर कर्जाचा बोजा चढविल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात दांम्पत्याविरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक विठ्ठल कोठावदे (५३) व सुनिता अशोक कोठावदे (४५ रा.दोघे गजानन नगर,काशीधरा रोड साक्री जि.धुळे) अशी संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी दिनेश रावसाहेब चव्हाण (४३ रा.वावरे एम्पायर अपा.कामटवाडा) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित कोठावदे यांच्या मालकिची कामटवाडा शिवारातील वावरे एम्पायर अपार्टमेंट मधील सदनिका चव्हाण यांनी खरेदी केली आहे. खरेदीपूर्वी सदनिकेवर कुठलाही कर्जाचा बोजा नसल्याचे संशयितांनी भासविले होते. त्यामुळे रोखीत व्यवहार होवून याबाबत खरेदीखत नोंदविण्यात आले होते. मात्र कालांतराने चव्हाण यांनी आपल्या वास्तूचा सातबारा उतारा काढला असता संशयितांनी घरविक्री नंतर २०२० मध्ये धुळे येथील पतसंस्थेकडून कर्ज उचलल्याचे समोर आले असून, त्याबाबत सदनिकेवर परस्पर बोजा चढविण्यात आला आहे.
या घटनेत चव्हाण यांची २३ लाख ६० हजार रूपयांची फसवणुक करण्यात आली असून याबाबत त्यांनी पोलिसांकडे दाद मागितली मात्र न्याय न मिळाल्याने न्यायालयात धाव घेतली होती. कोर्टाच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक कातकाडे करीत आहेत.