नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील भूखंडाची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी तत्कालिन प्रशासकासह लिपीक आणि भूखंड खरेदी करणा-याविरोधात अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिडकोचे औरंगाबाद येथील संजय प्रभाकर कुरे यांनी तक्रार दाखल केली असून ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे,तत्कालिन प्रशासक जी.व्ही.ठाकूर आणि लिपीक हर्षद हयात खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कुरे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२१ दरम्यान सिडको परिसरातील सर्व्हे नं. ९२९ मधील क्षेत्र ३७५९ चौ.मी.सेक्टर एन ८ हा भूखंड महानगर पालिकेकडे हस्तांतर झालेला असतांना तत्कालिन प्रशासक ठाकूर,लिपीक हर्षद खान व सोनवणे यांनी गैरमार्गाने व एकमेकांशी संगनमत करून कुठलाही अधिकार नसतांना जा.क्र.३२३७ च्या वाटपपत्राद्वारे २६ ऑक्टोबर रोजी सदरची मिळकत ज्ञानेश्वर सोनवणे यांना विक्री केल्याचे समोर आले आहे. त्यात ज्ञानेश्वर नावाची खाडाखोड आहे. दिवाणी न्यायालय व संचालक मंडळ ठराव क्र. ५७५९ च्या आदेशानुसार वाटप पत्र हा संदर्भ चुकीचा आहे.
सिडकोच्या खाती जमा करण्या करीत वापरण्यात आलेले चलन नं. ३६६४१ यावर व्हाईटनर लावून अंकाची खाडाखोड केलेली असल्याचे म्हटले आहे. तसेच चलन नं. ३६६४१,३६६४२, ३६६४३ व ३६६४४ हे चारही चलने ज्ञानेश्वर बाबुराव सोनवणे यांच्या नावावर असल्याने त्यावर काम करणारे लिपीक खान यांनी संशयास्पद काम केल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून सदरील भूखंड सोनवणे यांना बेकायदा विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.