नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हाडोळा भागात धुळवड निमित्त आयोजीत रंगपंचमी कार्यक्रमात तरूणीची छेडकाढत विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेत युवतीच्या कुटूंबियांनी जाब विचारला असता टोळक्याने तिच्या चुलत्यासह आई आणि भावास बेदम मारहाण केली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
चेतन बाळू वायदंडे (३५), इंद्रजित उर्फ इंदर बाळू वायदंडे (४०) व गणेश उर्फ युवराज संतोष वायदंडे (२३ रा.सर्व हाडोळा दे.कॅम्प) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून साहिल वायदंडे व सनी खाडे हे त्यांचे साथीदार पसार झाले आहेत. याप्रकरणी हाडोळा भागात राहणा-या युवतीने तक्रार दाखल केली आहे. धुलीवंदन निमित्त हाडोळा येथील बळवंत प्लाझा सोसायटीसमोर मंगळवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. गल्लीतील कार्यक्रम बघण्यासाठी तरूणी गेली असता ही घटना घडली. वाजंत्रीवर नाचत रंग उडविणा-या नागरीकांची ती गंमत बघत असतांना साहिल वायदंडे या युवकाने तिची छेड काढत विनयभंग केला. ही बाब युवतीने आपल्या कुंटुंबियास सांगितल्याने तरूणीचा भाऊ आई आणि चुलता जाब विचारण्यासाठी गेले असता संशयितासह त्याच्या मित्रांनी त्यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत टोळक्याने दगड व फरशीच्या तुकड्याचा वापर केल्याने मायलेकासह चुलताही जखमी झाला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.