नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागातील दोन बेकायदा दारु विक्री करणा-या अड्डयावर पोलिसांनी सोमवारी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत एक मद्य विक्रेता पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी या छाप्यात सुमारे साडे पाच हजार रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलेनगर येथील महाराणा प्रताप नगर भागातील सार्वजनिक शौचालय भागात एक जण बेकायदा मद्यविक्री करीत असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळाली होती. त्यानुसार सोमवारी पोलिसांनी धाव घेत छापा टाकला असता कृष्णा भिमसेन भोंड (३९ रा.महालक्ष्मी चाळ,महाराणा प्रतापनगर) हा दारू विक्रेता हाती लागला. संशयिताच्या ताब्यातून २ हजार ५९० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या असून याप्रकरणी युनिटचे कर्मचारी संपत बोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत. दुसरी कारवाई अंबड औद्योगीक वसाहतीतील आझाद नगर भागात करण्यात आली. संजीवनगर येथील अरविंद बाबुलाल सहाणी हा सोमवारी सायंकाळच्या सुमारास अंबड लिंकरोडवरील संगम स्टील कार्पोरेशन बिल्डींग समोर दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा लावत त्यास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यात प्रिन्स संत्रा नावाच्या देशी दारूचा सुमारे २ हजार ६२५ रूपये किमतीचा मद्यसाठा मिळून आला. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,याप्रकरणी अंमलदार जनार्दन ढाकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पानसरे करीत आहेत.