विमा कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करुन वृध्दास ५० हजार रूपयांचा ऑनलाईन गंडा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी करीत एकाने वृध्दास ५० हजार रूपयांना ऑनलाईन गंडा घातला आहे. दोन हप्ते भरल्यास पैसे काढता येतील असे सांगून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नवलचंद मदनलाल जैन (६३ रा.अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैन यांच्याशी गेल्या ३ फेब्रुवारी रोजी भामट्यांनी संपर्क साधला होता. ९३५५३२०१८२ या मोबाईल क्रमांकावरून भामट्यांनी जैन यांच्याशी संपर्क साधत इंडिया फस्ट लाईफ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी असल्याची बतावणी केली होती. यावेळी भामट्याने विमा पॉलीसीचे दोन हप्ते भरले तर जमलेली संपूर्ण रक्कम काढता येईल असे आमिष दाखवून हा गंडा घातला. हप्तांची ५० हजाराची रक्कम आयडीएफसी बँकेच्या लोअर परेल (मुंबई) या शाखेतील १०११२५२७९२४ या खात्यावर ऑनलाईन भरण्यास भाग पाडले. महिनाभराच्या कालावधीनंतर जैन यांनी विम्याची रक्कम काढण्यासाठी कंपनीशी पाठपुरावा केला असता फसवणुकीचा हा प्रकार समोर आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक आहिरे करीत आहेत.
ब्लेडने हल्ला केल्यामुळे ३३ वर्षीय युवक जखमी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आझाद चौकात त्रिकुटाने ब्लेडने हल्ला केल्यामुळे ३३ वर्षीय युवक जखमी झाला असून याप्रकरणी रवी बाजीराव थोरात (रा.मारूती मंदिराजवळ,काझीपुरा कोट) या युवकाने तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश, ईश्वर व लल्ला अशी युवकावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. थोरात शनिवारी (दि.४) रात्री आझाद चौकात उभे असतांना मद्याच्या नशेत आलेल्या हरिश याने कुरापत काढून त्यास शिवीगाळ केली. याप्रसंगी हरिश व त्याचा भाऊ ईश्वर आणि लल्ला यांनी त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करीत त्याच्यावर ब्लेडने वार केले. अधिक तपास पोलिस नाईक काकड करीत आहेत.