नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्यविक्रीच्या कारवाईत पोलिसांनी एका विक्रेत्यास गजाआड केले असून दुसरा पोलिसांची चाहूल लागताच दारूसाठा सोडून पसार झाला आहे. दोन्ही कारवायांमध्ये देशीदारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. शिंदे पळसे भागात ठिकठिकाणी राजरोसपणे देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने गुरूवारी (दि.२) विक्रेत्यांचा माग काढत चिंचोली फाटा गाठला असता हॉटेल शेतकरी पाठीमागे सुनिल तानाजी साबळे (२९ रा.मतेवाडीरोड,शिंदे गाव) हा मद्यविक्रेता पथकाच्या हाती लागला. संशयिताच्या ताब्यातून सुमारे दोन हजार ३१० रूपये किमतीच्या प्रिन्स संत्रा नावाच्या देशीदारूच्या ३३ बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. युनिटचे कर्मचारी सुगन साबरे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दुसरी कारवाई नायगाव रोड भागात करण्यात आली. देविदास कचरू साळवे (रा.शिंदेगाव) हा नायगावरोडवरील जि.प.शाळा भागात मद्यविक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१) रात्री नाशिकरोड पोलिसांनी धाव घेतली होती. मात्र शाळा भागातील पत्र्याच्या शेडमध्ये दारू विक्री करणाºया संशयितास पोलिसांची चाहूल लागल्याने त्याने दारूसाठा सोडून पोबारा केला. या कारवाईत १ हजार ५७५ रूपये किमतीचा देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून पोलिस शिपाई साळवे यांनी फिर्याद दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक पवार व गोसावी करीत आहेत.