नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोडला मुंबईच्या महिलेच्या पर्स मधील दागिणे चोरट्यांनी लंपास केले. शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वेस्थानक दरम्यान अॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना ही चोरी करण्यात आली. याप्रकरणी माधुरी अर्जुन बोरसे (५६ रा.विजयनगर,कल्याण) यांनी तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरसे यांच्या भावाचा मुलाचा बुधवारी (दि.१) संगमनेर येथील शारदा लॉन्समध्ये विवाह होता. दुपारच्या सुमारास त्या व-हाडाच्या बसमधून संगमनेर येथून शहरात दाखल झाल्या होत्या. कल्याण येथे जाण्यासाठी त्या रेल्वेस्थानकात जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करित असतांना ही घटना घडली. नाशिकरोड येथील शिवाजी महाराज पुतळा ते रेल्वेस्थानक दरम्यान प्रवासी भरलेल्या अॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना अज्ञात भामट्या प्रवाश्याने त्यांच्या पर्सची चैन उघडून सुमारे दोन लाख दहा हजार रूपये किमतीचे अलंकार चोरून नेले. त्यात पेंडल असलेली पट्टी पोत व नेकलेसचा समावेश आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जगताप करीत आहेत.