नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीएसआर फंडातून मोठ्या देणग्या मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुंबईच्या एकाने संस्थाचालकास दीड लाखाला गंडा घातला. अनिल रविंद्र राजेशिर्के (३७ रा.बोरीवली) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी केदा पुंडलीक जगताप (रा.दुर्गा नगर,कामठवाडारोड) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगताप यांची सेवाभावी संस्था असून गेल्या वर्षी संशयिताने गाठून त्यांना आपण आयसीआयसीआय बँकेत कार्यरत असल्याची बतावणी केली होती. यावेळी त्याने राष्ट्रीय आणि खासगी बँकामधील वरिष्ठ अधिका-यांशी आपली जवळीक आहे. कारखानदारांचे या बँकांमध्ये मोठ मोठे आर्थिक व्यवहार असतात व त्यांच्या मार्फत चॅरिटेबल ट्रस्टला सीएसआर फंडातून मोठ्या देणग्या दिल्या जातात. संबधीताच्या ओळखीच्या माध्यमातून तुमच्या संस्थेस चांगली मदत मिळवून देतो अशी ग्वाही त्याने जगताप यांना दिली होती. मात्र त्यासाठी थोडाफार खर्च करावा लागत असल्याचे सांगितल्याने जगताप यांनी २५ फेब्रुवारी २०२२ रोजी संशयितास व्दारका येथील आयडीबीआय बँकेतून ३० हजार व त्यानंतर १६ मार्च रोजी ७० हजार व ४ एप्रिल रोजी आयसीआयसीआय बँक पंचवटी शाखेतून ३० हजार रूपये काढून दिले होते. तसेच १६ व ३० एप्रिल रोजी पेटीएमच्या माध्यमातून ३ हजार ५०० रूपये संशयितास पाठविले होते. मात्र वर्ष उलटूनही जगताप यांच्या संस्थेकडे कुठल्याही कंपनीने पाठपुरावा केला नाही त्यामुळे जगताप यांनी संशयिताशी संपर्क साधला असता त्याने दमदाटी व धमकी देत घेतलेले १ लाख ३३ हजार ५०० रूपये देण्यासही टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.