नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कन्नमवार ब्रिज मार्गे आडगाव नाक्याकडून ते तपोवन क्रॉसिंगच्या दिशेने जात असतांना जे.के.टायर या दुकानासमोर पिस्तूलचा धाक दाखवत कारचालकाची लुट केल्याची घटना घडली. या घटनेत पल्सरस्वार भामट्यांनी लॅपटॉप असलेली बॅग पळविली. लुटारूंमध्ये इंदोर येथील तक्रारदाराच्या एका परिचीताचा समावेश असून अवनेश आयुष मथुराकेवट (२२ रा.गौरीनगर,इंदोर मध्यप्रदेश) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश भास्कर चित्ते (रा.आर्यपुत्र सोसा.स्नेहनगर म्हसरूळ) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरी आणि शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्ते मंगळवारी (दि.२१) महामार्गावरून आपल्या घराकडे जाण्यासाठी चारचाकीतून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. कन्नमवार ब्रिज मार्गे आडगाव नाक्याकडून ते तपोवन क्रॉसिंगच्या दिशेने जात असतांना जे.के.टायर या दुकानासमोर पाठीमागून एमएच ४६ एएम १०५३ या पल्सर दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून कार थांबविण्यास भाग पाडले. यावेळी पल्सर कारला आडवी लावून संशयितांनी धमकावित चित्ते यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. मात्र पैसे नसल्याबाबत चित्ते यांनी सांगताच भामट्यांनी कारच्या आसनावर ठेवलेली लॅपटॉप असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.