नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बेकायदा मद्याची वाहतूक पिकअप वाहनातून करणा-या विरुध्द अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत चालकास गजाआड केले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह सुमारे सहा लाख रूपये किमतीचा दारू साठा जप्त केला आहे. संशयिताचा एक साथीदार पसार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रमेश जाधव (२३ रा.रविराज सोसा.कमलनगर हिरावाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून प्रीतम चौधरी नामक त्याचा साथीदार पसार झाला आहे. दिंडोरी रोडवरून मोठ्याप्रमाणात बेकायदा मद्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.२२) रात्री अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लावला होता. रिलायन्स पेट्रोल पंप ते तारवाला सिग्नल दरम्यान भरधाव जाणा-या एमएच १५ जीव्ही ०६२५ या पिकअप वाहनाचा पाठलाग करीत पथकाने झडती घेतली असता त्यात देशी विदेशीसह बिअरचे बॉक्स आढळून आले. चालकास बेड्या ठोकत वाहनासह मद्यसाठा पोलीसांनी जप्त केला असून संशयिताचा साथीदार मात्र अंधाराचा फायदा उचलत पसार झाला आहे. पसार संशयिताचा पोलिस शोध घेत असून याप्रकरणी पथकाचे अंमलदार अविनाश फुलपगारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक वसावे करीत आहेत.