नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मौजमजा करण्यासाठी पादचा-यांच्या हातातील मोबाईल हिसकावणा-या चार जणांच्या टोळीला पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीकडून दुचाकीसह २२२ मोबाईल असा ४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. चेतन निंबा परदेशी (रा.शांतीनगर,सिडको),शशिकांत सुरेश अंभोरे (रा.पौर्णिमा स्टॉप शेजारी),विजय सुरेंद्र श्रीवास्तव (रा.जुने सिडको) व निखील अर्जुन विंचू (रा.पाथर्डी फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून ते महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. या संशयितांच्या अटकेने सरकारवाडा एक, आडगाव तीन, मुंबईनाका एक व सातपूर दोन अश्या सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.
शहरात वाढलेल्या मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिस शोध घेत असतांना हे आरोपी सापडले आहे. गुन्हे शाखेचे पथक कॅनडा कॉर्नर भागातील मॅग्नम हॉस्पिटल समोर घडलेल्या घटनेचा शोध घेत असतांना या चोरांची माहिती मिळाली. त्यानंतर परदेशी, अंभोरे व श्रीवास्तव यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या घटनेसह तब्बल सात गुह्यांची कबुली दिली. यावेळी चोरी करतांना इग्नायटर मोटारसायकलसह सुमारे ४ लाख ५३ हजार रूपये किमतीचे २२ मोबाईल हॅण्डसेट काढून दिले. पोलिस तपासात निखील विंचू हा संशयितांचा साथीदार असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास ताब्यात घेतले असता त्याने आडगाव हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यास आडगाव पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू उगले,जमादार रविंद्र बागुल, हवालदार प्रविण वाघमारे, प्रविण म्हसदे, शरद सोनवणे, नाझिमखान पठाण, संदिप भांड, पोलिस नाईक महेश साळुंके, प्रशांत मरकड, विशाल देवरे शिपाई मुक्तार शेख व आण्णासाहेब गुंजाळ आदींच्या पथकाने केली.