नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे येथील एकाने कार खरेदी विक्री व्यवहारात तब्बल पाच लाखाला गंडा घातला. कार अथवा पैसे न दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी मनोज धर्मराज देवरे (४६ रा.गोविंदनगर) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजीराव उर्फ संदिप सुजित काकडे (३१ रा. वाकड पुणे) असे फसवणुक करणा-या संशयिताचे नाव आहे.
तक्रारदार आणि संशयित यांच्यात गेल्या ७ डिसेंबर रोजी टोयाटो कंपनीच्या कार विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यानंतर पाच महिन्यांच्या कालावधीत संशयितास ४ लाख ९४ हजाराची रक्कम अदा करण्यात आली. मात्र संशयिताने रक्कम घेवूनही कार दिली नाही. कार अथवा पैसे न मिळाल्याने देवरे यांनी संशयिताकडे तगादा लावला असता त्याने टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
पादचारी महिलेचे मंगळसूत्र लांबवले
जेलरोड भागात रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे ७५ हजार रूपये किमतीची पोत चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती अशोक वारीकर (५५ रा.संत ज्ञानेश्वरनगर,जेलरोड) या शनिवारी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. परिसरातील तीन मंदिर समोरून त्या पायी जात असतांना समोरून डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक मुनतोडे करीत आहेत.
nashik city crime police theft cheating