नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील रेजिमेंटल प्लाझा भागात पार्क केलेल्या अॅक्टीव्हाची डिक्की उघडून चोरट्यांनी दोन लाखाची रोकड लंपास केली. याप्रकरणी अश्पाक युसूफ खान (३३ रा.बिलाल मस्जीद जवळ,अशोकामार्ग) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खान मंगळवारी (दि.३०) नाशिकरोड परिसरात गेले होते. रेजिमेंन्टल प्लाझा परिसरातील भंडारी डायग्नोस्टीक सेंटर समोर त्यांनी आपली अॅक्टीव्हा दुचाकी पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कश्याने तरी डिक्की उघडून दोन लाख रूपये असलेली बॅग चोरून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राकेश भामरे करीत आहेत.
हातातील मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला
पखालरोड भागात फोनवर बोलत रस्त्याने पायी चालणा-या युवकाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला. याप्रकरणी मंगेश साहेबराव पगार (३० रा.अशोका रॉयल,वडाळारोड पखालरोड) यांनी तक्रार दाखल केली असून मुंबईनाका पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पगार सोमवारी (दि.२९)परिसरातील खोडेनगर भागातून पायी जात असतांना ही घटना घडली. फोनवर बोलत ते पायी जात असतांना विठ्ठल मंदिर चौकात दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील सुमारे ६२ हजार ७५० रूपये किमतीचा आयफोन हिसकावून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक गिते करीत आहेत.