नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बापलेकाने पैसे घेवूनही रितसर खरेदी करून न देता फ्लॅट तिस-यास विक्री करुन पुण्याच्या ६५ वर्षीय वृध्दाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खरेदीदारासह विक्री करणा-या बापलेकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकेश राज प्रसाद व राजदेव प्रसाद (रा.दोघे चिंचखेड रस्ता, पिंपळगाव बसवंत, ता.निफाड) व गौरव आण्णासाहेब संत (रा. के.के.वाघ कॉलेज मागे, जय अंबेनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी महेंद्र आनंदराव पवार (६५ रा.पाशाण, बाणेर लिंकरोड, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार यांनी प्रसाद बापलेकाच्या नावे असलेला शहरातील श्री हाईटस अपार्टमेंटच्या तिस-या मजल्यावर असलेला फ्लॅट क्रमांक ५ या मिळकतीचा जानेवारी २०१५ मध्ये व्यवहार केला होता.
या मोबदल्यात ठरलेली रक्कमही अदा करण्यात आली होती. तक्रारदार आणि संशयित एकमेकांचे परिचीत असल्याने याबाबत खरेदी विक्रीची नोंदणी करण्यात आली नव्हती. संशयितांनी वृध्दाचा विश्वासघात करीत परस्पर ही सदनिका गौरव संत यांना विक्री केल्याचे समोर आले असून त्यामुळे पवार यांनी पोलिसांत धाव घेतली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.