नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुद्रालोन काढून देण्याचा बहाणा करून एकाने दीड लाखाची फसवणूक केली आहे. या फसणूक प्रकरणी सुयोग सुरेश शौचे (४६ रा.गुलालवाडी व्यायाम शाळा भद्रकाली) यांनी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शौचे यांना व्यवसायासाठी सरकारी योजनेतून कर्ज घ्यायचे होते. ऑनलाईन ते कर्ज प्रकरणाची पाहणी करीत असतांना भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. विविध कर्ज प्रकरणांची माहिती देत त्यांनी सरकारी मुद्रा लोनचीही माहिती दिली. यावेळी शौचे यांनी मुद्रालोनचे व्याजदर जास्त असल्याचे सांगितले असता संशयितांनी व्याजदराची टक्केवारी कमी करण्यासह कर्ज काढून देण्याची हमी दिली.
या कामी गेल्या जानेवारी महिन्यात भामट्यांनी त्यांना बँक खात्यात १ लाख ५८ हजार रूपयांची ऑनलाईन रक्कम भरण्यास भाग पाडले. पाच महिने उलटूनही कर्ज पुरवठा न झाल्याने व संशयितांशी संपर्क तुटल्याने शौचे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास निरीक्षक शरद निंबाळकर करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी; चोरट्यांनी ७८ हजाराचा ऐवज चोरून नेला
भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७८ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिणे लंपास केले. याप्रकरणी चेतन कैलास उगले (रा.गुरू शरण सोसा.ग्रीनपीस कॉलनी,धोंगडेनगर दत्तमंदिर) यांनी तक्रार दाखल केली आहे.
उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उगले कुटुंबिय बुधवारी (दि.१०) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सुमारे ७८ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.