नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोळीबार करुन चार महिन्यांपासून फरार असलेल्या संशयिताला पोलिसांनी गजाआड केले आहे. अक्षय उत्तम भारती (वय २४, रा. फ्लॅट नं ८, नक्षत्र बिल्डींग, संभाजी नगर, शिवाजी नगर, कार्बन नाका जवळ, सातपुर, नाशिक) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. मार्च महिन्यात जुन्या वादातून सातपूरमधील कार्बन नाका परिसरात चारचाकीचा पाठलाग करून त्यातील दोघांवर भरदिवसा गोळीबार करून ठार मारण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरोधात मोक्काअन्वये कारवाई केली होती.
शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने शिंदे गावात सापळा रचून या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल (अग्निशस्त्र), ४ जिवंत काडतुसे तसेच १ स्प्लेंडर मोटारसायकल (क्रमांक एम.एच. १५. डी. एन. ३६५७) असा एकूण एक लाख ४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ मार्च रोजी सातपुर पोलीस ठाणे हद्दीतील महिंद्रा सोना कंपनीजवळ संशयितांच्या स्कोडा गाडीने पाठीमागून धडक देऊन जुन्या वादाचा राग मनात ठेवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर गोळीबार करुन दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने वार करत जखमी केले होते.त्यानंतर या प्रकरणी शहरातील सातपूर पोलीस ठाण्यात विविध कलमांसह मोक्काअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले होते. त्यानुसार फरार संशयितांचा कोणताही सुगावा नसतांना विशेष मानवी व तांत्रिक कौशल्याचा वापर करुन सपोनि ज्ञानेश्वर मोहिते व त्यांच्या पथकाने फरार संशयित अक्षयला बुधवारी शिंदे गाव येथे सापळा रचून शिताफीने जेरबंद केले.