नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँक खात्यातील तब्बल सात लाखाची रक्कम मोबाईल बँकीगचा वापर करून परस्पर काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर अॅक्सेस मिळवित हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका इंडसइंड बँक ग्राहकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ ते १८ मार्च दरम्यान भामट्यांनी इंडसइंड बँक ग्राहकाच्या मोबाईल बँकीगचा वापर करून तसेच अॅक्सेस मिळवित खात्यातील सुमारे ६ लाख ९९ हजार रूपयांची रक्कम परस्पर अन्य चार खात्यांमध्ये वर्ग करून लांबविली आहे. याप्रकरणी पोलिस दप्तरी फसवणुकीसह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक कोल्हे करीत आहेत.
आडगाव परिसरात एकाची आत्महत्या
महामार्गावरील वृंदावननगर भागात ३८ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गणेश रामदास निकम (रा. जत्रा हॉटेल जवळ, वृंदावननगर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. निकम यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
निकम यांनी मंगळवारी (दि.२३) आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये अज्ञात कारणातून लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत मंगला शेलार यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.