नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट मालक उभा करून दुस-याच्या नावे असलेला प्लॉट परस्पर खरेदी विक्री केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी स्मिता सुभाष भावसार (रा.सावरकरनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसीम जावेद खान, मुदसर जारिक सय्यद, इरफान सिरोजुद्दीन सय्यद व मोहम्मद अस्लम वारसी (रा. वडाळागाव, इंदिरानगर) अशी ठकबाज संशयितांची नावे आहेत. भावसार यांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने संशयितांनी हा प्रकार केला आहे.
भावसार यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्लॉटचे बनावट कागदपत्र तयार करून तसेच बनावट मालक असल्याचे भासवून अंबड सब रजिस्टर ऑफिस क्रमांक ७ व सिन्नर सब रजिस्टर ऑफिस येथे वेगवेगळया प्लॉटची नोंदणी केली. हा प्रकार २ जुलै २०२१ व १० मे २०२१ रोजी करण्यात आला आहे. या परस्पर खरेदी विक्रीच्या प्रकरणात वारसदार महिलेची फसवणुक झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.