नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या उन्हाचा तडाखा तीव्र आहे. उकाड्यामुळे अनेक जण घराच्या छतावर रात्री झोपण्यास जातात. आणि हीच बाब गंगापूर गावातील एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली आहे.
उकाड्यामुळे कुटुंबिय छतावर झोपलेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे ३ लाख ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला. गंगापूर गावातील अहिल्यादेवी चौक भागात हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे लांबवले आहेत. याप्रकरणी किर्ती रतन गोधडे (रा.कालिका माता मंदिराजवळ, अहिल्यादेवी चौक, गंगापूरगाव) यांनी तक्रार दाखल केली असून गंगापूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोधडे कुटुंबिय गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे रात्रीच्या वेळी घराच्या छतावर झोपण्यासाठी जातात. सोमवारी (दि.२२) रात्री गोधडे कुटूंबिय नेहमी प्रमाणे छतावर झोपण्यासाठी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख ६५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.