नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील सिडको परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. पुन्हा एकदा सिडकोतील वाहने टवाळखोरांकडून लक्ष्य करण्यात आली आहेत. यावेळी तब्बल २५ ते ३० वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे एकप्रकारे नाशिक पोलिसांनाच टवाळखोरांनी आव्हान दिले आहे. याप्रकरणी पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे.
सिडको परिसरातील पवननगर येथे दोन दुचाकी वाहनांवर आलेल्या पाच ते सात टवाळखोरांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करून दहशत मजविण्याचा प्रयत्न केला. या टवाळखोरांनी हातात कोयता आणि लाकडी दांडूक्यांनी १५ ते २० दुचाकी, चार ते पाच रिक्षा आणि काही चार चाकी वाहनांची तोडफोड केली. या संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या अंबड आणि सिडको परिसरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झालीय. काल रात्री पवननगर मधील सप्तशृंगी चौक, स्वामीनारायण चौक या भागात युवकांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. ही वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.