नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिनेस्टाईल पाठलाग करुन सिडकोत झालेल्या गोळीबाराचे मुख्यसुत्रधार असलेल्या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने नाशिकरोड भागात ही कारवाई केली आहे. या टोळीतील अकरा जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सागर कचरू पवार (२८ रा.गणेशवाडी,पंचवटी) व पवन दत्तात्रेय पुजारी (२३ रा.तारवालानगर,दिंडोरीरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
सिडकोतील बाजीप्रभू चौकात सराईत गुन्हेगार तथा भाजपाचा माथाडी कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष राकेश तुकाराम कोष्टी याच्यावर रविवारी सकाळच्या सुमारास सिनेस्टाईल हल्ला झाला होता. अॅक्टीव्हावर देवदर्शनासाठी जात असलेल्या कोष्टी याच्यावर पल्सरस्वार त्रिकुटाने भरदिवसा गोळय़ा झाडल्या होत्या. या घटनेत दोन गोळया लागल्याने कोष्टी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅगवार मधून ही घटना घडल्याने पोलिसांनीही तात्काळ चक्र फिरवित नामचिन जया दिवेसह अन्य चौघांना जेरबंद केले होते. यापाठोपाठ युनिट १ च्या पथकाने मध्यप्रदेशातील ओमकारेश्वर नजीकच्या बडवाह जि. खरगोन या गावातून सात जणांना ताब्यात घेतले असून दुचाकीवरून गोळया झाडणारा सागर पवारही हाती लागल्याने या गुह्याच्या तपासास गती येणार आहे. ही कारवाई पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,जमादार मंलग गुंजाळ,हवालदार डी.के.पवार,पोलिस नाईक प्रदिप ठाकरे आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Cidco Firing Main Suspect Arrested