नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरू आहे. तरुण आणि प्रौढांनंतर आता लहान मुलेही आत्महत्येला जवळ करीत असल्याचे दिसून येत आहे. सातपूर परिसरातील ध्रुवनगरमध्ये घडलेल्या घटनेने सध्या चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. नैराश्यातून असे प्रकार होत असून अशा व्यक्तींनी संवाद साधावा किंवा त्यांच्याशी त्यांच्या कुटुंबिय आणि मित्रांनी संवाद साधावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
१५ वर्षाच्या मुलाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना ध्रुवनगर परिसरात घडली. राज सतिश शेलार (रा.शिवशक्ती ब्लासम रो हाऊस, ध्रुवनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. राजच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज शेलार या मुलाने बुधवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले.