नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पोबारा करणा-या सिन्नरच्या त्रिकुटाला पोलिसांनी गजाआड करुन त्यांच्याकडून तब्बल ४० मोबाईल हस्तगत केले आहे. नाशिकरोड, उपनगर आणि सातपूर पोलिस ठाणे हद्दीत या चोरट्यांनी या चो-या केल्या आहे. आकाश दशरथ राठोड (२१ रा. नायगाव रोड तळवाडे,सिन्नर), अभिषेक मच्छींद्र शेळके (२६ रा. सिन्नर) व अनिकेत सुभाष शेळके (२० रा. अश्विनी बाबा चौक,संजिवणीनगर सिन्नर) अशी मोबाईल चोरट्यांची नावे आहेत.
पोलिस तपासात सदरचे मोबाईल जबरीचोरीतील असल्याचे समोर आले असून, संशयितांना अटक करीत त्यांच्या ताब्यातील मोबाईलसह दुचाकी उपनगर पोलिसांनी जप्त केली आहे. उपनगर गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गौरव गवळी आणि जयंत शिंदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
सिन्नर येथील आडवारोड भागात चोरटे मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याच्या माहितीच्या आधारे पथकाने बुधवारी (दि.७ ) सिन्नर शहरात सापळा लावला असता संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. एमएच १७ सीयू ५२३८ या दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये तब्बल ४० मोबाईल आढळून आले.
या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक अतुल पाटील करीत आहेत. ही कामगिरी तांत्रीक विश्लेषन विभागाचे सहाय्यक निरीक्षक बेडवाल,शिपाई रूमाले तसेच उपनगर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विनोद लखन, अंमलदार गवळी,अनिल शिंदे,जयंत शिंदे,सुरज गवळी,कर्पे,राहूल जगताप,लोढे,शिरसाठ,रघतवान आदींच्या पथकाने केली.