नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंचवटी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. वडिलोपार्जीत मिळकतीचे मुखत्यारपत्र असल्याचे भासवून केस करण्याची धमकी देत मुळ मालकांकडेच पैशांची मागणी केल्यामुळे हा प्रकार पोलिस स्थानकात पोहचला आहे. याप्रकरणी संतोष पंडीत धोत्रे (४२ रा. रेणूका संकुल पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतिश दिपक वानखेडे, योगेश दिपक धोत्रे (रा. दोघे वडारवाडी, पेठरोड) व सविता नारायण माझी उर्फ सविता दिपक धोत्रे (रा. गायकवाड नगर, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत. धोत्रे यांच्या वडिलोपार्जीत मिळकतीचे संशयितांनी काही एक संबध नसतांना खोटे व बनावट जनरल मुखत्यारपत्रच बनवून त्यावर वकिला मार्फत नोटरी करून ते खरे आहे असे भासवून गंडा घालण्याचा प्रयत्न केला.
मुखत्यारपत्र खरे असल्याचे भासवून संशयितांनी १ जून ते ४ सप्टेंबर दरम्यान मुळ मालक असलेल्या धोत्रे यांच्यावर खोटी केस दाखल करण्याची धमकी देवून पैश्यांची मागणी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून चौकशीत मुखत्यारपत्रच बनावट असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पडोळकर करीत आहेत.
टपरीचालक सासू, सुनेस मारहाण
महामार्गावरील कुबोटा टॅक्टर शोरूम नजीकच्या समर्थनगर भागात गुटख्याची पुडी दिली नाही म्हणून टपरी चालविणा-या सासू सुनेस मारहाण केल्याची घटना घ़डली आहे. या घटनेत रिकामे कॅरेट फेकून मारल्याने एक महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश राठोड (रा.जत्रा हॉटेल जवळ समर्थ नगर) व तन्मय निकम (रा.अंबिका टेक्सटाईल मागे) अशी संशयितांची नावे असून राठोड याच्यावर शिर्डी पोलिसांनी तडिपारीची कारवाई केलेली आहे. याप्रकरणी शारदा दिलीप झाकडे (रा.महालक्ष्मीनगर,समर्थनगर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. शारदा झाकडे यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे. महामार्गावरील कुबोटा टॅक्टर शोरूम नजीकच्या समर्थनगर बसस्टॉप भागात त्या हातगाडी लावून आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली.
सोमवारी (दि.४) दुपारच्या सुमारास शारदा झाकडे व त्यांची सून आपला व्यवसाय सांभाळत असतांना दोघे संशयित तेथे आले. त्यांनी गुटख्याची पुडीची मागणी केली. मात्र झाकडे यांनी गुटखा विक्री करीत नसल्याचे सांगितल्याने संतप्त दोघांनी सासू सुनेस शिवीगाळ व दमदाटी करीत सासू सुनेस मारहाण केली. यावेळी एकाने झाकडे यांना रिकामा कॅरेट फेकून मारल्याने त्या जखमी झाल्या असून अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten