नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून परिचिताने एकास सहा लाखास गंडा घातला. या फसवणूक प्रकरणी राजेंद्र बबनराव जगताप (५१ रा.वासननगर, पाथर्डी फाटा) यांनी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन अडिच वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने तक्रारदाराने पैश्यांची मागणी केली असता ठकबाजाने शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजयकुमार मुंडावरे (रा.गणनायक अपा.न्यू विरा इग्लिश शाळेजवळ,गोविंदनगर) असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. जगताप आणि संशयित एकमेकांचे परिचीत असून, संशयिताने इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ओळख असल्याची बतावणी करीत जगताप यांच्या मुलीस नोकरीस लावण्याचे आमिष दाखविले होते.
या कामापोटी सहा लाखांची मागणी करण्यात आल्याने जगताप यांनी २८ जानेवारी ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ही रक्कम अदा केली. मात्र दोन अडिच वर्ष उलटूनही जगताप यांच्या मुलीस नोकरी लागली नाही. याबाबत जगताप यांनी मुंडावरे यांना जाब विचारत पैसे परत मागितले असता ही घटना घटली. संशयिताने जगताप यांना शिवीगाळ व दमदाटी करीत पैसे देण्यास नकार दिल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.