नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर फाटा भागात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणातून तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आल्याने ६५ वर्षीय इसम जखमी झाला असून त्याचा मोबाईलही फुटला आहे. संशयितांमध्ये महिलेसह तिच्या मुलाचा व अन्य एकाचा समावेश आहे. याप्रक्रणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबिका अभंग,तिचा मुलगा व अन्य एक जण आदींनी ही मारहाण केली. याप्रकरणी दत्तू वामण शिंदे (रा.मराठा कॉलनी म्हसोबानगर,चेहडी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. शिंदे यांच्याकडे अंबिका अभंग ही महिला काम करते. कामाच्या पैशांच्या हिशोबातून ही घटना घडली असून बुधवारी (दि.१०) महिलेस पैसे कमी मिळाल्याने तिने आपल्या मुलासह त्याच्या मित्रास शिंदे यांच्या घरी बोलावून घेत त्यांना जाब विचारला. यावेळी संतप्त त्रिकुटाने शिंदे यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत शिंदे जखमी झाले असून त्यांचा मोबाईलही फुटला आहे. अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी केला लंपास
जेलरोड परिसरातील गंधर्वनगरी भागात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ४७ वर्षीय महिलेच्या गळयातील मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी लंपास केले.याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता शशिकांत अमृतकर (रा.नवीन कलानगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अमृतकर बुधवारी (दि.१०) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. गंधर्व नगरी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाजवळून त्या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ४५ हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले. अधिक तपास उपनिरीक्षक गोळे करीत आहेत.