नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धार्मिक कार्यक्रमानिमित्त श्रीखंडाची दिलेली ऑर्डर पैसे न देता दुस-यानेच पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसिध्द चितळे बंधूच्या श्रीखंडावर भामट्याने हा डल्ला मारला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भुषण कारभारी सोनवणे (रा.आगरटाकळी) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे भाभानगर येथील प्रसिध्द चितळे एक्सप्रेस या दुकानाचे काम बघतात. या दुकानात गेल्या महिन्यात एका ग्राहकाने आठ किलो श्रीखंडाची ऑर्डर दिली होती. काही रक्कम अॅडव्हॉन्स म्हणून देत सदर इसमाने धार्मिक कार्यक्रमासाठी सुट्टे पैसेही उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.
त्यानुसार ४ एप्रिल रोजी सोनवणे यांनी ऑर्डरसह चिल्लर तयार ठेवली होती. सायंकाळी सदर व्यक्ती ऑर्डरसह चिल्लरचे पैसे देवून आपल्या वस्तू घेवून जाणार होता. सोनवणे आपल्या ग्राहकाच्या प्रतिक्षेत असतांनाच दुपारीच एका तरूणाने दुकान गाठून पैसे न देता श्रीखंडाच्या ऑर्डरसह चिल्लर घेवून पोबारा केला. साहेब नंतर पैसे देणार असल्याची बतावणी करीत भामट्याने हा डल्ला मारला असून या घटनेत सोनवणे यांचे सुमारे दहा हजार रूपयांची फसवणुक झाली आहे. अधिक तपास पोलिस नाईक सिध्दार्थ बिरारी करीत आहेत.